धरणगाव : प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे दि. २३ मार्च २०२६ रोजी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात एफ.वाय. व एस.वाय. बी.ए. (अर्थशास्त्र) विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयानंद वारडे तसेच डॉ. ज्योती महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली.
यानंतर प्राचार्य डॉ. उदय जगताप यांचे स्वागत डॉ. विजयानंद वारडे यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन केले. तसेच मागील वर्षी अर्थशास्त्र विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. रागिणी कैलास काकडे यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. अर्चना पाटील यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ. सुषमा तायडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. ज्योती महाजन यांनी प्रा. सुलताना पटेल व डॉ. सुषमा तायडे यांचे स्वागत केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात, मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कष्टांवर यश मिळवणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन केले आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविक डॉ. विजयानंद वारडे यांनी करत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. ज्योती महाजन यांनी मनोगतात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला डॉ. संजय शिंगाणे, प्रा. सुलताना पटेल, प्रा. पूर्वा कुलकर्णी, प्रा. सुषमा तायडे, प्रा. सुनील पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस.वाय. बी.ए.ची विद्यार्थिनी कु. राजश्री ज्ञानेश्वर सोनवणे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन भोई, योगेश पाटील व दिपक महाजन यांनी विशेष सहकार्य केले.



