भुसावळ : प्रतिनिधी
साकरी गावात किरकोळ कारणावरून एका तरुणावर आठ जणांच्या टोळक्याने संगनमत करून निघृण मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सुरेश तायडे (वय ४८, रा. तठोरा, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या दरम्यान साकरी गावातील किन्ही रोडवर, खोकली माता मंदिरासमोर ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा हेमराज हा साकरी गावात कार घेऊन आला, या कारणावरून आरोपींनी वाद उकरून काढला.
त्यानंतर प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर आणि सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ) यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव तयार केला. आरोपींनी हातातील लाकडी दांडे व फावड्याचे दांडे वापरून हेमराज याला बेदम मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी पाठीवर, हातापायांवर, डोक्यावर व खांद्यावर वार करून त्याला जखमी केले. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत “विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारू” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



