मुंबई : वृत्तसंस्था
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सकाळीच त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चाकणकर यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे.
पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा.



