मुंबई : वृत्तसंस्था
भारत निवडणूक आयोग यांनी रविवारी पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या होत्या. बारामतीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. तर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल –
अधिसूचना जाहीर : ३० मार्च २०२६
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ एप्रिल २०२६
मतदान : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राहुरी मतदारसंघात दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
बिनविरोध निवडणुकीची शक्यता
या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना आवाहन करताना राहुरी आणि बारामती येथील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत व्यक्त केले होते.
अहिल्यानगरमधील पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “या दोन्ही ठिकाणी सहानुभूतीची परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” महाराष्ट्रातील मागील काही पोटनिवडणुकांचा इतिहास पाहता सहानुभूतीच्या लाटेमुळे आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे.



