धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथे काल रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने मिळून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. मात्र, सायंकाळपर्यंत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने नेमके काय चोरी झाली, याची माहिती मिळाली नाही. यामुळे पाळधीत खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील साईबाबा नगरमधील रहिवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलुप होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडून त्यातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ते आज सकाळी घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत प्रवेश करताच घरातील कपाट उघडे दिसले व त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी लागलीच पाळधी पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन माहिती घेतली. तर भजी गल्लीतील रहिवासी भूषण प्रभाकर पाटील हे घराला खाली कुलुप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते.
नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. त्यांनीही याबाबत पाळधी पोलिसांत माहिती दिली आहे. या दोन्ही घरातून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. सकाळी उघडकीस आलेल्या घटने बाबत पाळधी पोलिसांत सायंकाळपर्यंत मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे नेमके काय चोरीस गेले, हे कळाले नाही. मात्र, आज दिवसभर पाळधी पोलिसांचा फौजफाटा दोन्ही ठिकाणी गेला होता व त्या परिसरातील सीसीटीव्हिची तपासणी केली. याबाबत पाळधी पोलिसांत उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.



