यावल : प्रतिनिधी
शेतातील विहिरीजवळील गुलाबाचे फुल तोडताना तरुणीचा तोल गेला आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे बुधवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दिलीप सपकाळे (२२, रा. शिरसाड, ता. यावल) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. ती बुधवारी सकाळी गावालगत असलेल्या एका शेतात फुले तोडण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीजवळील गुलाबाच्या झाडावरून फुल तोडत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली आणि लक्ष्मीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी किरण दिलीप सपकाळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहेत. या घटनेने शिरसाड गावात शोककळा पसरली असून, स्थानिक लोकांनी शेतातील विहिरीच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.



