लाईव्ह महाराष्ट्र न्युज : सोनवद येथे ७ मार्च रोजी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ धरणगाव (जि. जळगाव), दि. १ मार्च : नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१) अंतर्गत सोनवद येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय धरणगाव यांच्या वतीने आयोजित हे शिबिर शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, सोनवद येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरात नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप आदी सेवा समाविष्ट आहेत.
तसेच उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, घरकुलासाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, अकृषिक (NA) तरतुदींविषयी मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी संदर्भातील ‘कमी-जास्त’ पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची कामेही करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.



