जळगाव प्रतिनिधी :
Devagiri Nagari Sahakari Bankच्या चाळीसगाव शाखेतून Umang White Gold Private Limited या कंपनीच्या नावाने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते एनपीए घोषित करण्यात आले. त्यानंतर बँकेने कायदेशीर कारवाई सुरू करत कंपनीशी संबंधित शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी खासदार Unmesh Patil यांची चाळीसगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. या संदर्भात बँक प्रशासनाने आणखी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.
कर्ज थकीत; कारवाईची प्रक्रिया
उद्योग कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कंपनीला अतिरिक्त मुदत दिली होती. तरीही थकबाकी न भरल्याने कायदेशीर पावले उचलण्यात आली. दरम्यान, कंपनीचे संचालक उन्मेश पाटील यांच्यासह संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्रसामग्री संगनमताने विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे बँकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आदी कलमान्वये नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
जानेवारीत मालमत्ता ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप केला होता तसेच आपण कर्जदार नसून जामीनदार असल्याचे म्हटले होते.
तथापि, १५ जुलै २०२५ रोजी बजावलेल्या नोटीसीनंतर बँकेने चाळीसगाव येथील नगर भूमापन क्रमांक २७६ मधील ७११.६० चौरस मीटर क्षेत्रफळाची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही पूर्ण केली. महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनियमानुसार १ जानेवारी २०२६ रोजी सदर मालमत्ता अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली.
जाहीर नोटीसमधील इशारा
बँकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या जाहीर नोटीसमध्ये संबंधित मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. अन्यथा बँकेच्या बोजाची रक्कम सुमारे ६ कोटी ६४ लाख ४५ हजार ७०० रुपये तसेच मुद्दल ६ कोटी १६ लाख ५४ हजार ८३५ रुपये आणि १ ऑक्टोबर २०२३ पासूनचे व्याज यांस अधीन राहावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



