नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असताना आता नागपुरातील यशोधानगर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाने त्याच्या सख्ख्या मामीचा विनयभंग केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने पिडीतेसोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला यशोधरा नगर भागात आपल्या पती व कुटुंबासह राहते. आरोपी हा तिचा नात्याने भाचा असून काही दिवसांपासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता. पहिल्यांदा १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महिला आपल्या बेडरूममधील कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी आरोपी बेडवर झोपल्याचे भासवत होता. महिला कपडे घेऊन बाहेर पडत असताना आरोपीने अचानक तिच्या मागून पकडण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला घाबरली व तिने आरोपीला जाब विचारला. मात्र आरोपीने कोणतेही उत्तर न देता घटनास्थळावरुन पळ काढला.
त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य घरात नसल्याने महिला घाबरली होती. तरीही नातेसंबंधांमुळे तिने तो प्रसंग दुर्लक्षित केल्याचे सांगितले जाते. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा महिला घरात एकटी असताना समोरच्या खोलीचा दरवाजा लावत होती. त्याच वेळी बेडरूममध्ये दबा धरून बसलेल्या आरोपीने पुन्हा तिच्या पाठीमागून येत महिलेला बेडवर ढकलून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे महिला घाबरली, मात्र तिने धैर्य दाखवत आरोपीला जोरात धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेनंतर ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
सततच्या छळाला कंटाळून अखेर महिलेने यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या विनयभंगासंदर्भातील विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.



