मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील सालबर्डी येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सकाळी घडली. सालबर्डी येथील सर्वेश प्रकाश (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते सालबर्डी शिवारातील योगेश लक्ष्मण झोपे यांच्या शेतात शेतीकामासाठी गेले असताना अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने सर्वेश यांचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरखालून त्यांना बाहेर काढण्यात आले तत्काळ त्यांना मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप वानखेडे पुढील तपास करत आहेत.



