मालेगाव : वृत्तसंस्था
मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केल्याची घटना समोर आली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शहरात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले होते. मात्र, समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्या प्रभागातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजता बैठकीसाठी बोलावले होते. वीज समस्येवर चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही काळ प्रतीक्षा केल्यानंतरही अधिकारी न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रमजान महिन्यामुळे सायंकाळच्या नमाजाची वेळ झाल्याने आंदोलकांनी कार्यालयातून बाहेर न पडता विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज अदा केल्याचे स्पष्ट केले. “आम्ही बाहेर पडलो असतो, तर आमची समस्या प्रलंबितच राहिली असती आणि अधिकारी निघून गेले असते,” असे आंदोलकांनी सांगितले. या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप नेते किरिट सोमैया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापालिका वीज विभागाच्या कार्यालयात जाहीरपणे नमाज अदा करण्यात आल्याचे नमूद करत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिका आणि पोलिसांनी ही घटना घडल्याचे मान्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सोमैया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, आत्ता मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज, असे नमूद केले. काही महापालिका कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून वीज विभागाच्या कार्यालयात जाहीररित्या नमाज अदा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्रीांकडे केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.



