चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान वाहन पार्किंगच्या कारणावरून शिवभक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत सपोनि चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात शक्ती ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वाहन पार्किंगच्या कारणावरून काही शिवभक्त आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शिवभक्तांनी “तुम्ही दादागिरी करत आहात का?” असा सवाल उपस्थित केला असता, “हो, मी करणार दादागिरी,” असे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर वातावरण अधिकच तापले.
वाद वाढत गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे काही काळ रेल्वे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी मध्यस्थी करत शिवप्रेमींची समजूत काढली. यावेळी शिवप्रेमींनी “पोलीसांनी दादागिरी करायची असेल तर ती गुंड आणि गुन्हेगारांवर करावी, सर्वसामान्य जनतेवर नाही,” असे म्हणत रोष व्यक्त केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. याबाबतची अधिकृत माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी दिली. घटनेनंतर परिसरात शांतता असून पुढील तपास सुरू आहे.



