धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव येथील श्री भोलेसरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उत्सवाबाबत गावात आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री निमित्त भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या मिरवणुकीत सुमारे 20 ते 21 आकर्षक झाक्या (देखावे) सादर करण्यात येणार आहेत. विविध धार्मिक आणि पौराणिक संकल्पनांवर आधारित झाक्यांमध्ये भुतों की बारात, कालीमाता, बाबा बर्फानी, महाकाल आदी देखावे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक रामदेवजी बाबा नगर येथून प्रारंभ होऊन नियोजित मार्गाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार आहे. डमरू-ताशांचा गजर, हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या शिवमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
गावातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री भोलेसरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



