भंडारा : वृत्तसंस्था
नशिबाने लादलेल्या अंधत्वाचा स्वीकार करून खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि ध्येयाचा ध्यास घेतला तर अशक्यही शक्य होते, हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील कन्या ममता पंढरी नाकतोडे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेच्या निकालात ममताने ‘योगिक सायन्स’ या विषयातून घवघवीत यश मिळवत JRF (ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे, या विषयातून संपूर्ण भारतात अंध प्रवर्गातून निवड झालेली ती एकमेव मुलगी ठरली आहे.
ममता ही जन्मत: अंध नव्हती. वयाच्या १५ व्या वर्षी एका गंभीर आजारामुळे डोळ्यांच्या मागील पडद्याला (रेटिना) इजा झाली आणि तिची दृष्टी कायमची गेली. अचानक आलेल्या या संकटाने अनेकजण खचले असते; मात्र ममताने हार न मानता शिक्षणाचा मार्ग सुरूच ठेवला. भागडी येथील प्रशांत महाविद्यालयातून इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली.
सन २०२१ मध्ये ममताने जळगाव येथील ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. एम.पीएससीचा अभ्यास करत असतानाच तिने जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ‘एम.ए. इन योगिक सायन्स’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने यूजीसी नेट परीक्षेचा अर्ज भरला आणि पहिल्याच प्रयत्नात हे ऐतिहासिक यश मिळवले.
भागडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन, दृष्टी नसतानाही ममताने मिळवलेले हे यश केवळ भंडारा जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे. “डोळे नसले तरी स्वप्न पाहता येतात आणि जिद्द असेल तर ती सत्यात उतरवता येतात,” हा संदेश ममताने आपल्या यशातून दिला आहे. तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल भागडी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



