सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब आणि संभ्रम निर्माण करणारा राजकीय प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांची उपस्थिती आणि त्याचबरोबर स्वतःच्याच पक्षाच्या चिन्हावरील उमेदवाराला मतदान न करण्याचे थेट आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणाच्या निवडणुकीवरून सध्या शिवसेनेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रगती दगडे निवडणूक रिंगणात आहेत. महायुती असूनही एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने प्रचाराच्या सुरुवातीलाच संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
कालच्या सभेत भाषण सुरू असताना स्थानिक नेते संतोष पाटील यांनी एकनाथ शिंदेंना एक चिठ्ठी दिली. ती वाचल्यानंतर शिंदेंनी तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा प्रचार केल्याचे दिसून आले. मात्र, याच सभेत त्यांनी “शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, महायुतीचा धर्म पाळा,” असे थेट आवाहन केले.
“नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नाहीत. येथे महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे,” असे वक्तव्य शिंदेंनी केल्याने उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
दरम्यान, या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्योत्स्ना पाटील या मुळच्या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असून शिवसेनेने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांचे पालन न केल्याने आघाडीचा धर्म राखण्यासाठी प्रगती दगडे यांना अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या सोलापूर दौऱ्यात केवळ वादच नव्हे तर मोठे राजकीय संकेतही मिळाले. बार्शी येथे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल हे शिंदेंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिंदेंनी मंचावरूनच त्यांना शिवसेनेत प्रवेशाची थेट ऑफर दिल्याने बार्शीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, मोहोळ येथे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून एकनाथ शिंदेंचे स्वागत केल्याने राजकीय सीमारेषा पुसट होत असल्याचे चित्र दिसून आले. महायुतीतील अंतर्गत विसंवाद, विरोधी आमदारांची जवळीक आणि स्वतःच्या पक्षातील उमेदवाराबाबत दिलेले संदेश यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.



