अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरात २९ जानेवारी रोजी पहाटे पत्नी व तिच्या प्रियकराने अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला अटक करण्यात आली आहे. सुनील श्रावण भोई (३४) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. सुनीलची पत्नी दीपाली भोई (३०) व तिचा प्रियकर अजय छोटू भोई (३२) आणि त्याची आई सुरेखा छोटू भोई, अशी गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही जणांची नावे आहेत.
आत्महत्येच्या घटनेची सुरुवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद होती. सुनील याचा भाऊ सागर श्रावण भोई यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर या घटनेचा उलगडा झाला. २९ रोजी रात्री सुनील भोई याने पत्नी व तिच्या प्रियकराला बोलताना पाहिले. त्यानंतर झालेल्या वादात वरील दोघा संशयितांनी सुनील यास अपशब्द बोलून टोमणे मारले. यावेळी सुरेखा भोई हिनेही अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सुनील भोई याने दुचाकीने टाकरखेडा मार्गावरील रेल्वे रुळ गाठून रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील तीनही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३३३, ३५१ (२), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



