धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शिवारासह तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, पिंप्री, वाघळूद परिसरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मका, ज्वारी व हरभरा ही पिके पूर्णपणे भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गावर संकट ओढावले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच वादळाचा जोर वाढत मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की फळधारणेला आलेली रब्बी पिके अक्षरशः जमिनीवर लोळण घेत होती.
यावर्षी धरणगाव तालुक्यात मक्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. पाटाचे आवर्तन उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील पिके चांगल्या स्थितीत होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. सर्वाधिक नुकसान मक्याचे झाले असून गहू पिकालाही मोठा फटका बसला आहे.
खरीप हंगामात आधीच नुकसान झाल्याने रब्बीवर तरी खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजाचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शासकीय मदत व नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.



