जळगाव : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी दोन तरुणांवर सिमेंटचा ब्लॉक फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील चहाच्या टपरीसमोर घडली. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात राहणारा दिनेश माने हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असताना मागील भांडणाच्या कारणावरून अयान शरिफ पटेल, अनिस रेहमान पटेल व त्यांच्या आणखी एका साथीदाराशी त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि तिघांनी मिळून दिनेश माने यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून त्यांना गंभीर जखमी केले.
माने यांना वाचविण्यासाठी त्यांचा मित्र अमोल मोरे धावून आला असता, आरोपींनी त्याच्याही डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर दिनेश माने यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित अयान शरिफ पटेल, अनिल रेहमान पटेल व अन्य एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश वाघ करीत आहेत.



