पुणे : प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ आणि सक्षम उमेदवार देण्याऐवजी विविध राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना तसेच सध्या तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध करत राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे.
पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळ्यांतील तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म भरून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, अपहरण, खंडणी आणि गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या गुंडांच्या पत्नींनाही विविध पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना पक्षाने तिकीट दिले असून त्या सध्या तुरुंगात आहेत. यावर प्रश्न उपस्थित करत दमानिया म्हणाल्या,
“नगरसेवकाचे काम कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे हे असते. ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत, त्या जेलमधून नागरिकांची कामे कशी करणार?”
अजित पवार गटाने याशिवाय गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आणि खुनाच्या आरोपाखाली असलेल्या बापू नायर तसेच गजा मारणे यांच्या पत्नींना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोपांचा सामना करणाऱ्या देविदास चोर्घे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी, “अशा लोकांकडून नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायच्या? कचरा उचलला जाईल का? गटारे साफ होतील का? जनतेची कामे होतील का? राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या पार्श्वभूमीवरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



