भुसावळ : प्रतिनिधी
निंभोरा बुद्रुक, ता. भुसावळ येथे अज्ञात तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौतम हरी साळवे (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. राम मंदिराच्या मागे, निंभोरा) यांच्या फिर्यादीनुसार, ते घरासमोरील अंगणात असताना अज्ञात आरोपी भरधाव गाडीने रस्त्यावरून येत शिवीगाळ करू लागले. त्यावरून वाद निर्माण झाला. याच वेळी आरोपींपैकी एकाने चाकू काढून गौतम साळवे यांच्यावर वार केले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या वडिलांनाही शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर जखमी गौतम साळवे यांना तातडीने भुसावळ येथील खासगी रूग दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत. आरोपींचा शोधासाठी पथक कार्यरत आहे



