जळगाव : विजय पाटील
भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात युती होणार की नाही या बाबत अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अजूनही ट्विस्ट असला तरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे. यात प्रामुख्याने भाजप व शिवसेना या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये जास्त रस्सीखेच आहे.
२०१८च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात वर्चस्व राखत चारही जागा जिंकल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांत महानगरपालिकेत सत्तांतर नाट्य रंगल्याने चारही नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेना फुटीनंतर तीन माजी नगरसेवक भाजपत आले, तर एक नगरसेवक शिवसेनेत आहे. त्यामुळे प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे.
भाजपकडून नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे, तर शिवसेनेतील एकमेव माजी लोकप्रतिनिधी वगळता व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवार कोण असणार?, याबाबत अजून स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडे इच्छुकांची गर्दी
मागील निवडणुकीत या प्रभागात चारही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. यात मीना सपकाळे, दत्तात्रेय कोळी, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे विजयी झाले होते. परंतु, यात दत्तात्रेय कोळी यांचे निधन झाले, तर मीना सपकाळे, रंजना सपकाळे हे भाजप सोडून शिवसेना व पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेणे कठीण आहे. तर भाजपकडून नवीन व तरुण उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.
संमिश्री वस्ती, मागासवर्गीयांचा प्रभाव
प्रभागातील आरक्षण सोडतीत ओबीसी व सर्वसाधारण या जागा पुरुषांसाठी निघाल्या आहेत, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील दोन्ही जागा महिलांच्या असून, त्यावर सर्वच पक्षांकडून इच्छूक उमेदवार दावेदारी करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या प्रभागात अनुसूचित जाती (एसी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील सात हजारांपेक्षा अधिक मतदान आहे. शिवाय लेवा पाटील, कोळी व तेली समाज समाजाचे मोठे मतदान असल्याने आगामी निवडणुकीत जातीय समीकरण लक्षात ठेवून उमेदवारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
इच्छूक उमेदवार
प्रभागातील इच्छूक उमेदवारांमध्ये भाजपकडून नीलेश (आबा) तायडे, सुनील (बंटी) भारंबे, एससी व एसटी गटातून कैलास सोनवणे यांची कन्या प्रतीक्षा सोनवणे, अर्चना पाटील इच्छूक आहेत. माजी नगरसेवकांमध्ये रंजना सपकाळे यांचे पती भरत सपकाळे यांना उमेदवारी तिकीट मिळविण्यास शक्ती लावत आहे. शिवसेनेकडून प्रवीण कोल्हे, सुषमा दीपक चौधरी व अन्य तीन ते चार जण इच्छूक आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनदेखील इच्छूक हे पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.



