चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेच्या विनयभंग प्रकरणात गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मेहुणबारे पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०१६ रोजी गु.र.क्र. ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. महिलांविरुद्धच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलीसांसाठी प्राधान्याचे होते.
दरम्यान, आरोपी मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळताच प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत अंधेरी (मुंबई) येथून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस मेहुणबारे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पोलीस हवालदार शांताराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार व संजय लाटे यांनी केली.



