धाराशिव : वृत्तसंस्था
सोलापूर आणि बीडनंतर आता धाराशिवमध्ये नर्तिकेशी प्रेमसंबंधातून वाद झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अश्रुबा अंकुश कांबळे (25, रुई ढोकी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील साई कला केंद्रात नृत्य करणाऱ्या महिलेबरोबर अश्रुबाचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे काल शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. परतत असताना मृत अश्रुबाच्या पत्नीचा फोन आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद चिघळताच अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी देऊन तेथून निघून गेला.
नर्तिकेने ही धमकी गांभीर्याने घेतली नाही. मात्र काहीच वेळात अश्रुबाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी संबंधित महिला नर्तिकेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



