जळगाव : प्रतिनिधी
जलजीवन मिशनच्या कामाचे बिल अदा केले जात नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कामकाज थांबवून दालनाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडून ठेवले. हा धक्कादायक प्रकार ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत घडला. या प्रकरणी ठेकेदार नीलेश रमेश पाटील (रा. दादावाडी) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांच्या बिले रखडली आहेत. अलीकडे काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व ठेकेदारांना अंशतः रक्कम देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. ठेकेदार नीलेश पाटील याचे बिलही प्रलंबित असल्याने तो याच मागणीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पोहोचला. तेथे त्याने दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना “तुम्ही कामकाज कसे करता ते पाहतो” अशी धमकी दिली. त्यानंतर दालनाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून कामकाज ठप्प केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विभागात गोंधळ उडाला. उपस्थितांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती बिघडतच गेली.
घडलेला प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक किशोर वसंत निकम (वय ५३) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून त्यावरून नीलेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली असून निधीअभावी रखडलेल्या कामांबाबत ठेकेदारांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सूत्रांकडून समजते.



