सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.
मृत डॉक्टर फलटणला ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्याचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने माझ्यावर ४ वेळा अत्याचार केला, असे म्हटले होते. तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असताना तोच शरण आला. दुसरीकडे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मूळ गावी त्या महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार झाले. मृत डॉक्टरच्या बहिणीने सांगितले की, मागील महिन्यात माझे तिच्याशी बोलणे झाले. ती म्हणाली, पोस्टमॉर्टेमसाठी माझ्यावर दबाव येत आहे. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी दबाव येत होता. त्याला नकार दिल्यामुळे तिला त्रास वाढत गेला. आम्ही पाच पानांचे पत्र दिले. त्याची चौकशी झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ८० ते ९० पोस्टममॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती आत्महत्या करूच शकत नाही, असेही तिच्या बहिणीचे म्हणणे आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने २३ ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, तर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही फलटणला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेने तळहातावर लिहिलेल्या मजकुरात प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला होता. त्याला २४ ऑक्टोबर रोजी मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
विरोधकांकडून लक्ष्य केले जाणारे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना कडक शासन करावे. त्या डॉक्टर भगिनीच्या मोबाइलचा सीडीआर तपासला पाहिजे. यातून अधिक सत्य बाहेर येईल.
सातारा येथील जय भगवान प्रतिष्ठानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी. यात भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकरांचीही चौकशी व्हावी. निवेदनावर डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. रमाकांत साठे आदींच्या सह्या आहेत.


