वडीगोद्री : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आले असून आता २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा वाटणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवावा, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना केले. अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की माझ्यावर मीडियात बोलू नका, मी थांबतो तुम्ही लढा. कुणबीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवा. तुम्ही तुमचा दुसरा कोणताही जीआर काढा, पण गरीब मराठ्यांचा २ सप्टेंबरचा जीआर आणि शिंदे समितीला धक्का लागू देऊ नका. मी एका वर्षात २ सप्टेंबरच्या जीआरच्या मदतीने सगळे मराठे आरक्षणात घालून दाखवतो असेही जरांगे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या परवानगीशिवाय हैदराबाद गॅझेटविरोधात याचिका दाखल करायची भुजबळची टाप नाही. फडणवीस तुम्ही मोठ्या मनाने जीआर काढला आहे, भुजबळ त्याला विरोध करतोय. तुमचं बळ असल्याशिवाय, तुमची साथ असल्याशिवाय भुजबळमध्ये जीआरविरोधात याचिका दाखल करण्याचं बळ नाही. तुम्ही आमच्याशी डाव खेळू नका. तुम्ही काढलेल्या जीआरच्या विरोधात तुमच्याच सरकारमधील लोकं कसे जातात? त्यांना विरोधात जायला तुम्ही तर सांगितलं नाही ना? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.
तुमच्या नाकावर टिचून भुजबळने जीआर विरोधात पाच याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कशा दाखल केल्या? हे तुम्ही तर करायला लावलं नाही ना? असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज तुमच्यावर खूश आहे, तुम्ही मराठ्यांचा विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना केले. फडणवीस तुम्ही भुजबळाचा जामीन रद्द करा आणि त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.


