मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात अनेक शहरांच्या नावात बदल केल्यानंतर आता गेली चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्याने होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतरण करण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाच्या अध्यादेशामुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज आणि रेल्वे, पोस्ट खात्याच्या नोंदींमध्येही शहराचा उल्लेख ‘ईश्वरपूर’ असाच होणार आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै रोजी इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. आता, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने ‘ईश्वरपूर’ या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे. याबरोबरच, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे नामांतराची प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.
केंद्र सरकारने शहराच्या नामांतरणास मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षांचा लढा यशस्वी झाल्याची भावना शहरवासीयांमध्ये आहे. हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीची पुनर्स्थापना असल्याचे मानले जात असून, शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यापुढे शासकीय कामकाजात आणि स्थानिक जीवनातही ‘इस्लामपूर’ ऐवजी ‘ईश्वरपूर’ हे नाव रूढ होणार आहे.


