भुसावळ : प्रतिनिधी
रेल्वे इन्स्टिट्यूट परिसरात दारू पिणाऱ्या व्यक्तींना हटकल्याचा राग आल्याने रेल्वे कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील १५ बंगला परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन प्रतापसिंग खरारे (वय ४०, रा. सरस्वतीनगर) गेली १७ वर्षे रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये खलाशी पदावर कार्यरत असून, रात्रीच्या वेळी परिसराची देखरेख करतात. २ रोजी रात्री ११:०० वाजता गस्त घालत असताना त्यांनी काही व्यक्तींना दारू पिताना पाहिले. त्यांनी त्यांना इशारा दिला असता संबंधितांनी चिडून बबलू ठाकुर, अजय सहारे, सुजित सहारे व मनोज सहारे (सर्व रा. शिवाजीनगर) यांना बोलावले. यानंतर या चौघांनी खरारे यांच्यावर हल्ला चढवला.
अजय सहारे याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर मारहाण केली. सुजित सहारे याने चाकू काढून डाव्या त्यांच्या डोळ्याजवळ वार केला. शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. खरारे गंभीर जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात प्राथिमक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी ४ रोजी रात्री तक्रार दाखल करण्यात आली आहे. हवालदार अर्चना अहिरे तपास करीत आहेत.


