मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील हरताळा येथील फाटा रस्त्यावरील सुकलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी गळून माळेगाव येथील दोन व्यक्तींच्या डोक्यावर पडल्याने ते जखमी झाले.
हरताळा फाटा ते गावादरम्यान गेल्या दोन वर्षांपासून सुकलेले झाड आहे. त्याच्या फांद्या अधूनमधून गळत असतात. अशीच फांदी रविवारी दुपारच्या सुमारास पडली. यावेळी येथून जाणारे संगीताबाई कैलास भिल्ल (४०, रा. माळेगाव) व विशाल कैलास भिल्ल (२१, रा. माळेगाव) हे जखमी झाले. त्यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली आहे. दोघा जखमींना तत्काळ हरताळा येथील अनिल बाळू कोळी यांनी मुक्ताईनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.



