जळगाव : प्रतिनिधी
घरामध्ये वाद झाल्यानंतर पती बाहेर गेला आणि पत्नी सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना या विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी नशिराबाद येथे घडली.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नशिराबाद येथे सारिका वाघुळदे या पती व दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. सारिका व डिगंबर यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले असून, या घटनेने त्यांचे मातृछत्र हिरावले गेले आहे. दोघांच्या प्रेमविवाहाचा वादाने शेवट झाला. मालवाहू रिक्षाचालक असलेला पती बाहेर गेला. घरी सारिका यांनी विष प्राशन केले. ही घटना लक्षात येताच त्यांना जीएमसीत दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



