जळगाव : प्रतिनिधी
श्रीराम चिट्स फंड प्रा.लि.कंपनीचे मॅनेजर विवेक बिरे (रा. जळगाव) यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणातील गुन्ह्यात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
यावल येथील व्यावसायिक प्रशांत कासार यांनी श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीचे एजंट मुकेश पाटील यांच्याकडे लाइफ पॉलिसी काढण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयटी रिटर्नसह आवश्यक कागदपत्रे दिली होती. मात्र, याच कागदपत्रांचा वापर मोमीन शेख तौसिफ शेख कामील या व्यक्तीच्या जामीन अर्जासाठी करण्यात आल्याचे समोर आले. प्रशांत कासार यांना नोटीस मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चौकशीनंतर श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा व्यवस्थापक विवेक बिरे आणि एजंट मुकेश पाटील यांच्या विरोधात रामानंद नगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात विवेक बिरे याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी हा चिच्टस फंडच्या नावाखाली झालेला अपहार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मॅनेजर बिरे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.



