चाळीसगाव : प्रतिनिधी
सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाऊंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम तरुणाला अखेर नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँचच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ही व्यक्ती कोण ? त्याला पाहण्यासाठी शहर पोलिसांत गर्दी उसळली होती. या तरुणाचे नाव रणजितकुमार सुदेशकुमार दराडे (३२, रा. गवळीवाडा, नेताजी चौक, चाळीसगाव) असे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. त्यामुळे ‘शांताबाई’ आज कोणावर तोफ डागणार याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागून असे. दरम्यान, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँच यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तपासाअंती दराडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शांताबाई या सोशल मीडियावरील बनावट अकाउंटबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस स्टेशन व सायबर क्राइम ब्रँच, जळगाव यांच्याकडे यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. त्यांना मात्र अपयश आल्याची चर्चा यानिमित्ताने पुढे आली आहे. शांताबाईचा खरा चेहरा आता समोर आला आहे. एक ते दीड वर्षांचा सुरु असलेला हा डिजीटल लंपडाव अखेर संपला आहे. चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे.



