जामनेर : प्रतिनिधी
फर्दापूर तांडा (ता. सोयगाव) येथील चव्हाण परिवार वन्हाडींना घेऊन घरी परतत असताना शनिवारी, ११ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता पहूर-जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात ६५ वर्षीय दशरथ रतन चव्हाण जागीच ठार झाले, तर अकरा जण जखमी झाले. जखमींमध्ये सात वर्षीय कार्तिक राठोडचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फर्दापूर तांडा येथील रमेश चव्हाण यांच्या मुलाच्या विवाहासाठी चव्हाण परिवार लहासर येथील रामपूर तांड्यावर गेले होते. विवाह आटोपल्यानंतर ते चारचाकीने (क्र. एमएच ०८ आर ३५२४) घराकडे परतत होते. सोनाळा फाट्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (क्र. जीजे १५ एक्स १४२५) त्यांच्या कारला धडक दिली. हे वाहन तीन वेळा उलटले. यात दशरथ चव्हाण जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले. जखमींमध्ये माजी सरपंच हिरा चव्हाण, काळू बापू चव्हाण, वस्त्राम नुरा जाधव, उखा दलू राठोड, धीरलाल खंडू राठोड, लखीचंद शंकर चव्हाण, मोहनदास शंकर जाधव, विक्रम मोतीलाल चव्हाण, बाळू जाधव, भिवसेन मनुर चव्हाण आणि सात वर्षीय कार्तिक राठोडचा समावेश आहे.
जखर्मीना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करून चार ते पाच जणांना पुढील उपचारासाठी जळगाव रुग्णालयात हलविण्यात आले. सोनाळा फाट्याजवळ यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. ५ मे रोजी साखरेचा ट्रक उलटला होता. ऋत्विक पांडव, लखन चौधरी, आकाश चिकटे, सुदाम लाहसे, रवींद्र सपकाळ यांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. एफसीआय सदस्य रामेश्वर पाटील आणि आरोग्यसेवक ज्ञानेश्वर पांढरे यांनी रुग्णवाहिकेने मदत केली. पोलिस कर्मचारी ईश्वर कोकणे आणि सुभाष पाटील यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.



