जळगाव : प्रतिनिधी
बनावट पत्ता देऊन पशुखाद्य मागविल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत जळगावातील व्यापारी कांचन सुरेश येवले (३८, रा. पिंप्राळा) यांची दोन लाख ३४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी गोरख कैलास दुधारे (रा. गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन येवले यांचा पशुखाद्याचा व्यवसाय असून, त्यांचे औद्योगिक वसाहत परिसरात कार्यालय आहे. त्यांच्याशी गोरख दुधारे याने संपर्क साधून आपला पशुखाद्याचा व्यवसाय असून तुमच्याकडून पशुखाद्याच्या १७० गोण्या पाठवा असे सांगितले. त्यानुसार येवले हे दोन लाख ३४ हजार रुपये किमतीच्या पशुखाद्याच्या १७० गोण्या ट्रकमध्ये घेऊन ते स्वतः सांगितलेल्या पत्त्यावर देऊन आले. त्यावेळी मात्र दुधारे तेथे हजर नव्हता. आपण कन्नड येथे असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे पाठवितो असे त्याने सांगितले; मात्र बरेच दिवस झाले तरी रक्कम मिळत नसल्याने येवले यांनी ३० डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोरख दुधारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहेत.



