जळगाव : प्रतिनिधी
दुचाकी काढत असताना तिचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी विक्की सुनील सोनवणे (२४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शिवीगाळ करीत मारहाण केली. या तरुणाच्या – डोक्यावर व पाठीवर दगड, फरशीचे तुकडे मारल्याने त्याला दुखापत झाली आहे. ही घटना ७ जुलै रोजी भजे गल्लीतील एका हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विक्की सोनवणे हा तरुण ७ जुलै रोजी, भजे गल्लीत मित्रांसह बसलेला होता. तो त्याची दुचाकी काढत असताना दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून त्याला दुसऱ्या दुचाकी चालकाने शिवीगाळ केली. याचा तरुणाने जाब विचारला असता त्याला सहा जणांनी मारहाण केली. त्यानंतर विक्की व त्याचे मित्र तेथून निघून गेले. मात्र, तरीदेखील त्यांच्या मागे जाऊन सहा जणांनी या तरुणाच्या डोक्यात व पाठीवर दगड व फरशीचे तुकडे मारून दुखापत केली.
जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विक्की सोनवणे याने ८ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध बीएनएस कलम ११८(१), १८९(१), १८९(२), १९१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पल्लवी मोरे करीत आहेत



