राज्यात सध्या थंडीचा पारा वाढत आहे. तर रात्री व पहाटेच्या सुमारास नागरिक जागोजागी शेकोटी करीत उब मिळवत आहे तर यामध्ये पुरुषापेक्षा नेहमी महिलांना जास्त थंडीचा सामना करावा लागत असतो, हे तुम्हीही पाहिले असेल. मात्र असे का होते, याचा विचार कधी केला आहे का ? सहसा महिलांना नेहमीच जास्त थंडी जाणवते आणि त्यांना शाल, स्वेटर किंवा जॅकेटची गरज असते.
का वाजते जास्त थंडी ?
याचं खरं उत्तर म्हणजे स्त्रियांचा मेटाबॉलिज्म रेट (चयापचय दर) कमी असतो. शरीरातील मेटाबॉलिज्ममुळे उर्जेचे उत्पादन होते, ज्यामध्ये उष्णतेचाही समावेश असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 98.6 डिग्री इतकेच असते, तरीही पुरूषांना जास्त उकडतं. खरंतर पुरूषांमध्ये मसल मास जास्त असते, त्यामुळे उष्णतेचे उत्पादन देखील अधिक होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मसल मास कमी आणि मेटाबॉलिज्म रेटही कमी असल्याने त्यांना थंडी जास्त वाटते.
योग्य तापमान किती ?
अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की स्त्रियांना खोलीचे तापमान 25 डिग्री पर्यंत आवडते, तर पुरुष 22 डिग्री तापमानाला प्राधान्य देतात. जर घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असेल तर घराचे तापमान 18 डिग्रीपर्यंत ठेवता येते. परंतु जर घरात वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर 20 डिग्री तापमान योग्य ठरते. तसेच चांगली झोप हवी असेल तर खोलीचे तापमान खूप थंड किंवा खूप गरम ठेऊ नये. झोपताना खोलीचे तापमान आरामदायक वाटेल असेच ठेवावे.
थंडीच्या दिवसांत घर उबदार ठेवणे गरजेचे असते. तर उन्हाळ्यात घर कसं गार राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे.
दरवेळेस थंडी वाजणे चांगले नाही
– जर तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर ते एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे खालील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– तुम्हाला सतत थरथर जाणवत असेल.
– खूप दिवसांपासून ताप असल्यास.
– नखं निळी पडली असतील तर
– त्वचा खूप कोरडी झाली असेल तर
अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांना भेटून योग्य औषधोपचार करावेत.