पुणे : वृत्तसंस्था
मराठी चित्रपटामध्ये आपली छाप सोडणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली आहेत. गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याचे वृत्त होते. मात्र आज सकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये त्यांची प्रकृती खालावली होती. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते व्हेंटिलेटवर होते.
विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे.
अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.