मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचं शिर्डीतील अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील १९९५ सालचा शरद पवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत जयंत पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे.
या नव्या सरकारला स्थापन होऊन अवघे साडेतीन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जयंत पाटील यांनी सरकार पडण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर मविआ सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतील शिबीर झाल्यानंतर हे सरकार पडेल”, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे.
अशी भाकितं यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहेत. १९९५ साली जेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार झालो, तेव्हा ५ वर्षं शरद पवार आम्हाला सांगायचे की पुढच्या महिन्यात सरकार पडणार. पण मनोहर जोशींचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार असं म्हणत यांच्या पक्षाचे जे लोक शिंदे गट आणि भाजपाकडे निघून चालले आहेत, त्यांना अडवण्यासाठी अशी भीती दाखवणारी विधानं केली जात आहेत.
तसेच, अजित पवारांच्या विधानावरही शहाजीबापू पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. अजित पवार किंवा शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? पाडायचं होतं की सरकार. त्या वेळी एवढंसं सरकार होतं. शिवसेना-भाजपाच्या १०० जागाही नव्हत्या. ते तुम्हाला पाडता आलं नाही. आता खणखणीत १७५ आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. ते आता तुम्ही पाडायला लागले आहात. तुम्ही एवढे बुद्धीवान आहात का? उगीच त्यांचे कार्यकर्ते अडवण्यासाठी ते करत आहेत”, असं शहाजीबापू म्हणाले.