जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज दि २९ रोजी जळगाव मनपाच्या आवारात पदाधिकाऱ्यानी ठिय्या आंदोलन देत घोषणाबाजी सुरु असताना आयुक्त गायकवाड हे याठिकाणी आले असता ते कार्यालयात जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदनासाठी पुढे आले असता आयुक्त गायकवाड यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नसल्याने कार्यकर्त्यांनी आयुक्त हटावच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.
काय होते निवेदन
गेल्या चार वर्षांपासून जळगाव शहरातील रहिवाश्यांना जळगाव शहर मनपा प्रशासन व लोकप्रतिनीधी रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा इ. नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असून शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व प्रभागातील, कॉलन्यांमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून अमृत योजना व भुयारी गटारी खेदकामाने सर्वच भागातील रस्त्यांना खोल खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून जिवीत व शारीरिक इजा पोहचत आहे. शहरातील सर्व रस्त्यांची कामे मंत्री व पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना देऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावरही कामांना सुरूवात करण्यात आली नाही. शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्ता गणेश विसर्जन पूर्वीच तयार होऊन गणपती विसर्जन मिरवणूक या रस्त्यावरून निघणार होती परंतु मनपा प्रशासन व जळगाव शहरातील महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेते, सर्व नगरसेवक, आमदार यांनी शिवाजीनगर पुलाप्रमाणेच या रस्त्याचे काम भिजत घोंगड्याप्रमाणे लटकवून ठेवले असल्याने साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही की या रस्त्याचे व येथील गटारीचे काम कधी पूर्ण होईल. ४२ कोटींचे संपूर्ण शहरातील रस्त्याची कामे एकाच मक्तेदाराला दिले असून त्याच्याजवळ संपूर्ण यंत्रणा व कामाचा कोणताही अनुभव नसल्याने कमी दरात सब कॉन्ट्रॅक्टरांना कामे देण्यात येत असल्याने सब कॉन्ट्रॅक्टर कामे करण्यास तयार नाही. जे सब कॉन्ट्रॅक्टर कमी दरात कामे करीत आहे ते कामाची गुणवत्ता टिकवू शकत नसल्याने दोन ते तीन महिन्यातच रस्ते खराब होत आहेत. तीच गत गटारीबाबत झाली असून शहरातील नवीन वाढीव भागात रस्ते व गटारी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्याची स्वच्छता, गटारी व शौचालयाची स्वच्छता होत नसतानाही मक्तेदारांची बिले वेळेवर काढण्यात येत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरील दिवाबत्ती, शिवजीनगर पुलावरील विद्युत खांब तसेच महामार्गावरील विद्युत खांबांच्या कामाला अजूनही सुरूवात होऊ शकलेली नाही.
गेल्या ६ महिन्यांपासून मनपातर्फे शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पिण्यायोग्य पाणी शहरवासीयांना मिळत नसून पिवळसर दुर्गंधीयुक्त, वेळी-अवेळी, रात्री बेरात्री कमी दाबाने व खंडीत होऊन मिळ आहे. अशी वाईट परिस्थिती शहरातील नागरिकांवर आली असून यास मनपा प्रशासन, सत्ताधारी व विरोधी पदाधिकारी, नगरसेवक, आमदार जबाबदार आहेत. तरी शहरातील रस्ते व गटारी इ. काम त्वरीत सुरू करून वेळेवर पूर्ण करण्यात यावे. रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता दररोज करण्यात यावी. दिवाबत्ती व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात येत असून मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
यांनी केले आंदोलन
महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिकू चौधरी, मंगला पाटील, यशवत पाटील, भगवान सोनवणे, किरण राजपूत अमोल कोल्हे, अक्षय सोनवने यांच्यसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.