मुंबई : वृत्तसंस्था
100 कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. आता पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी विशेष कोर्टात आज अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांनी याबाबतचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणामुळे विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.