मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीतल्या वादामुळे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात हमरीतुमरी झाली. दोन्ही गटात वाद झाले, या वादाचं पर्यावसान नंतर हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांचंही नाव यात आलं असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या शिवसैनिकांकडे चॉपर, तलवार अशी हत्यारं असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे. त्यावरुन शिंदे यांनी ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. सदा सरवणकर यांच्यावर बंदूक बाळगल्याचा आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्याचीही शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.