नाशिक : वृत्तसंस्था
शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कार्यकर्त्यावर जे गुन्हे महाविकास आघाडीच्या काळात दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तर आता नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
दहा दिवसांपूर्वी वाजतगाजत आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला काल ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वाकडी बारव येथून निघालेल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून आरतीनंतर शुभारंभ करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी काहीकाळ ढोल वादनाचाही आनंद घेतला.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, ॲड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, रामसिंग बावरी, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, जगदीश पाटील, सतीश शुक्ल, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त आदींसह विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
सुरवातीला महापालिकेसह भद्रकाली येथी साक्षी गणेश, चांदीचा गणपती, दंडे हनुमान मित्र मंडळ, विनायक पांडे यांचा शिवसेवा मित्र मंडळ, वसंत गिते यांचे मुंबई नाका मित्र मंडळ, नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्र मंडळ, रोकडोबा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा, नाशिकचा राजा आदींसह २० मंडळे सहभागी झाली होती. पावसाच्या शक्यतेने मिरवणुकांना सकाळी लवकर सुरवात झालीतरी दोन मंडळांत मोठे अंतर पडल्याने या मिरवणुका मध्यरात्री रस्त्यावरच होत्या.
ढोलवादनाने वाढवली रंगत
पोलिसांनी डिजेसारख्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंडळाच्या सहस्रनाम ढोल पथकात तब्बल साडेतीनशे वादक उपस्थित होते, यात ९० ढोल व २१ ताशांसह १२ ध्वजधारक सहभागी झाले होते. मानाच्या महापालिकेच्या गणपती मिरवणुकीत गरीबरथ ढोल पथकाचे १२० वादक ६० ढोल व १८ ताशांसह सहभागी झाले होते, तर भद्रकाली येथील साक्षी गणेश मंडळाच्या मिरवणुकीत मार्तंडभैरव ढोल पथकाने रंगत वाढविली.