नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजासंदर्भातही त्यांनी सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या दि ११ रोजी दिल्लीत पार पडणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर श्री पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती श्री देवकर यांनी पवार यांना दिली. त्यानंतर श्री पवार यांनी पुढील दिशानिर्देश देवकर यांना दिले. यासोबतच जिल्हा बँकेचा कारभार, बँकेच्या वसुली संदर्भात होणारे प्रयत्न, आणि पुढील नियोजनाची माहिती श्री पवार यांनी देवकर यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण सूचना पवार यांनी चेअरमन देवकर यांना केल्या. त्यानुसार पुढील कामकाजाची दिशा निश्चित करण्याचे नियोजन आपण केले असल्याचे श्री देवकर यांनी स्पष्ट केले.