जळगाव : प्रतिनिधी
चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली आज.
जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान याबाबत आमदार लताताई सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती.
काय आहे प्रकरण?
लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.
उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस मागणी आहे.तसेच विधानसभेत दोन नंबरच्या उमेदवाराला विजय घोषित करावे.
– जगदीशचंद्र वळवी (माजी आमदार)