स्वामी समर्थ नगर व गनाबाप्पा नगर मधिल रस्ते काँक्रीटीकरणला सुरुवात !
धरणगाव प्रतिनिधी : दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते विकासाचा दुवा ठरत आहे असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे रस्ते भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते.
धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक 306 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (६० लक्ष ) गनाबाप्पा नगर गट क्रमांक 305 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (57 लक्ष) अशा दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी १ कोटी १७ लक्ष निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगरोत्थान मधून मंजूर करण्यात आलेला आहे. नुकतीच या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली असून जिल्ह्याचे पालकमंत्रीनामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सदर दोन्ही कामांच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, न. पा. च्या पदाधिकारी , नगरसेवक , अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध व नियोजन करून कामे करावी, शहरातील हातात घेतलेली संपूर्ण कामे पूर्ण करणार असून स्वामी समर्थ नगरातील खुल्या जागेचा विकास करणार आहे त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. धरणगाव शहरात विविध प्रकारचे विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करत असल्याची टिकाही ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
यावेळी बाल कवयित्री कु. देवर्षी महाजन तसेच आयान अलिम शिरपूरकर यांचा प्रथम आल्या बद्दल सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन शिवसेना शाखां फलकांचे अनावरण !
शहरातील जैन गल्ली व बालाजी गल्ली येथे शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. जैनगल्ली शाखा प्रमुख म्हणून राजमाल संचेती , अक्षय मुथा यांची तरबालाजी गल्ली येथे गणेश महाजन यांची शाखा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सत्कार केला.
सदरच्या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांमुळे नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळतील त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले.
याप्रसंगी सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शहराचा विकास हा झपाट्याने होत असल्याने विरोधक हादरले आहेत. सदर परिसरातील ओपन स्पेसचे विकास करण्यासाठी त्यांनी पालकमंत्री यांना साकडे घातले.यावेळी दोन्ही कॉलनी वासीयांतर्फे संजयनाना पवार उपशिक्षक आर. डी . महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
रस्ते भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, न पा गटनेते पप्पू भावे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष सौ. उषाताई वाघ, संजयनाना पवार, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेवक विलास महाजन , विजय महाजन, अरुण पाटील, अनुपम अत्तरदे, व्ही आर पाटील, कैलास महाजन, किरण पाटील, कार्तिक पाटील, ज्ञानेश्वर माळी, सुरेशनाना चौधरी,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, मुख्याधिकारी जनार्धन पवार यांच्यासह स्वामी समर्थ नगर व गनाआप्पा नगर भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.