लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे प्लॉटिंग भागात राहणाऱ्या रहिवाशांनी तुंबलेल्या तलावासह गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथील बाभूळगाव परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना घरासमोर तुंबलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी बाभूळगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या बोगस कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.
यासंबंधीचे निवेदन संपूर्ण गावकर्यांतर्फे धरणगाव तहसीलदार यांना सादर करण्यात आले असून साचलेल्या पाण्याची तसेच भूअंतर्गत गटारींची योग्य ती चौकशी करून यात दोषी असलेल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ मंडळांनी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ग्रामसेवकाचे उडवाउडवीचे उत्तर
यासंदर्भात ग्रामसेवकाकडे नागरिक तक्रार घेऊन गेले असता ग्रामसेवकाने नागरिकांच्या भावनांचा विचार न करता प्रत्यक्षपणे उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळून एक प्रकारे शासनाच्या होणाऱ्या फसवेगिरी ला हातभार लावला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाईची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.