जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यासह सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देखील आयोजित केले जात आहे. जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध आकाराचे गणराया साकारले. विशेष म्हणजे या मूर्ती तयार करताना त्यात वृक्षबीज टाकण्यात आले असून मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामाध्यमातून असून जिल्हाभर विविध उपक्रम साजरे केले जातात. उडानच्या संस्थापिका हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉ.जयश्री कळसकर यांच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी, शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणचे आयोजन केले होते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी समाजातील डोळस, सुशिक्षित आणि सदृढ नागरिकांना देखील शक्य होणार नाही अशा शाडू मातीच्या अतिशय सुबक मुर्त्या साकारल्या.
उडाणतर्फे शाडू मातीच्या मूर्ती साकारताना त्यात विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्याने पर्यावरणाला हातभार लागणार असून वृक्ष लागवडीने निसर्ग देखील सुखावला जाणार आहे. पर्यावरणपूरक मूर्तींचे दिव्यांग विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरण करण्यात आले. समाजाकडून दुर्लक्ष होत असलेल्या दिव्यांग मुलांच्या गुणांना वाव देण्याचे काम उडाणतर्फे करण्यात आले आहे. उपक्रमासाठी रुशीलच्या संचालिका हर्षाली चौधरी व सहकारी जयश्री पटेल, सोनाली भोई, हेतल वाणी, आयुषी बाफना व इतरांनी परिश्रम घेतले.