भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकेगाव येथील तब्बल ७ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्या पाणी पुरवठा योजनेचे आज ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात आले. जलजीवन मिशनच्या अंतर्गत या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून या माध्यमातून साकेगावला ही योजना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच याप्रसंगी दोन्ही मंत्र्यांनी साकेगावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी साकेगाव येथे जलजीवन मिशनच्या अंतर्गत ७ कोटी ३५ लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे कार्यान्वयन हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आज या योजनेचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन तर उदघाटक म्हणून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, जिल्हा दूध संघाचे प्रशासक अजय भोळे, माजी पंचायत समिती सभापती वंदनाताई उन्हाळे, माजी जि.प. सदस्य डॉ. वसंतराव खारखंडे, समाधान पवार, नगरसेवक पिंटू ठाकूर, सरपंच सौ. योगिता विष्णू सोनवणे, उपसरपंच आनंदा ठाकरे, प्रितीताई पाटील, माजी पं.स. सुनील महाजन, बाजार समिती संचालक संजय पाटील, प्रमोद सावकारे, चुडामण भोळे, भैय्या पाटील, पंकज पाटील, देविदास साबळे, पाणी पुरवठा अभियंता श्री एस पी लोखंडे आदींसह ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी साकेगाव ग्रामपंचायत / ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी कुदळ मारून या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट ग्रामपंचायत साकेगावचे उपसरपंच आनंदा ठाकरे यांनी केले. त्यांनी दोन्ही मंत्री महोदयांसह आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून गावात विविध विकासकामांना चालना मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. आमदार संजय सावकारे आपल्या मनोगतातून म्हणाले की, आधीचे सरकार असतांना आम्ही विरोधात होतो. मात्र गुलाबभाऊंनी विकासकामे मंजूर करण्यात कोणताही भेदभाव केला नाही. यामुळे साकेगावसह अन्य गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. आता दोन्ही मंत्र्यांच्या सहकार्याने तालुक्यातील इतर कामांना मंजुरी आणि निधी मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबत भुसावळ शहरातील अमृत योजनेच्या कामाला गती मिळून वाढीव निधी मिळावा असेही ते म्हणाले. तर आमदार निधीतून रूग्णवाहिका देणार असल्याची घोषणा देखील आमदार सावकारे यांनी केली.
खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या की, जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल या संकल्पाची सुरूवात केली असून या माध्यमातून पंतप्रधानांनी गावाच्या विकासाचा विचार केल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जलजीवन मिशनच्या यशस्वीतेसाठी आपण झटून प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या योजनेत प्रत्येक घरापर्यंत नळाने शुध्द पाणी पुरवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे आपण आधीदेखील प्रयत्न केले असून आताही तेच प्रयत्न सुरू आहेत. ना. गिरीशभाऊ हे आता ग्रामविकास मंत्री असल्याने त्यांनी २५/१५ या लेखाशीर्षाच्या अंतर्गत जास्त निधी मिळवून द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर, भुसावळ आणि जळगाव शहरातील अमृत योजनांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही दोन्ही मंत्री मुंबईत वरिष्ठ स्तरीय बैठक घेऊन हा प्रश्न तडीस नेऊ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
या योजना झाल्या मंजूर !
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे ७ कोटी ३५ लक्ष , फुलगाव व ३ गावे योजना १३ कोटी ५४ लक्ष , कंडारी येथे १७ कोटी ८९ लक्ष आणि कुर्हे पानाचे व ३ गावे योजना २३ कोटी ४७ लक्ष मंजूर केल्या आहेत. यासोबत जिल्हा परिषदे मार्फत भुसावळ तालुक्यात यापूर्वी फेकरी,भानखेडे, जोगलखेडे, वांजोळे, सुनसगाव, गोंभी, हतनूर, निंभोरा, पिम्प्रीसेकम या ९ गावाना ५ कोटींच्या योजना मंजूर झाल्या असून याच्या कामांना सुरुवात देखील झाली आहे.
या गावांच्या योजनांना लवकरच मंजुरी !
दरम्यान, आगामी १५ दिवसात भुसावळ तालुक्यातील २३ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुरी मिळणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ – १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार आहे. यामध्ये साकरी, तळवेल, ओझरखेडा, टहाकळी, शिंदी, भिलमळी, मांडवेदिगर, चोरवड, बोहर्डी, जाडगाव काहूरखेडे , कन्हाळे बु. व खु , खडके, खेडी , मिरग्व्हान, मन्यारखेडा, वेल्हाळे आदी गावांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे भुसावळ नगरपालिका हद्द व ग्रामीण भागाची हद्द न येणाऱ्या भुसावळ शहरालगतच्या ग्रामीण रहिवासी यांच्यासाठी सुमारे १२ कोटींची योजना देखील मंजूर करण्यात येणार असून यासाठी सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
अध्यक्षस्थानावरून ना. गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही राजकारण आडवे येणार नाही. आम्ही दोन्ही मंत्री असल्याने हा चांगला योग असून विकासासाठी याचा लाभ होणार असल्याची ग्वाही ना. गिरीश महाजन यांनी दिली. तर साकेगाव ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक करत त्यांनी निधीसाठी कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे आवर्जून नमूद केले. आभार साकेगावचे उपसरपंच आनंदा ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.