मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुजीत पाटकर आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक मित्रही आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुजित पाटकरांविरोधात तक्रार करुनही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ३८ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापनाचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुजित पाटकर आणि सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रं बनवली. तसं त्याच्या आधारे जम्बो कोविड सेंटरमधील वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबातचं कंत्राट मिळवलं, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.