जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेतील घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६१४ शिक्षक गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व बोगस शिक्षकांना तात्काळ सेवेतून कमी करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शिक्षणाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रकाशित झालेल्या बातम्यामधून आम्हाला या ६१४ शिक्षका पैकी फक्त ७१ शिक्षकांचे फक्त वेतन थांबविण्यात आले असल्याचे समजले. परंतू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याने सर्व ६१४ शिक्षकांना पदावरून कमी करून त्यांना अध्यापन करण्यापासून तात्काळ थांबविणे गरजेचे असताना सुद्धा फक्त ७१ शिक्षकांवर कारवाई केली जात आहे. ती सुद्धा फक्त वेतन रोखण्याची यावरून या विषयास प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे पुनश्च स्मरण पत्र देऊन ८ दिवसात बोगस शिक्षकांना अध्यापनाच्या कार्य करण्यापासून त्वरित रोखावे व त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे. अन्यथा 8 दिवसा नंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेऊन पुढील आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे रावेल लोकसभा अध्यक्ष गौरव वाणी , प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, गणेश निबाळकर, रुपेश सुर्यवंशी, राहुल जोशी, हितेश वाणी आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.